img_8258
Group Image from land art residency 
From left to right Ganesh Dhoke (standing), Vilas Bhongade, Mathilde Francke, Sunanda Joshi, Shweta Bhattad, Prajakta & Atul, Manjot kaur, Gopa Roy. Second row our Small Friends, Priyanka Kumar, Vasant Futane, Parvinder Singh. Third row Bibhuti Nath, Lalit Vikamshi, Kalyani Uday

उत्सव.. ग्राम धरेचा..गावातील भूमिचा.. शेतकऱ्याच्या काळ्या आईचा चित्रोत्सव! अतिशय आगळी वेगळी, काव्यात्मक  कल्पना!

                            4 नोव्हेंबर  2016.. श्वेताचे नागपूरचे घर.. मुंबईची  कल्याणी, कोलकत्याची प्रियांका, आगरतळा-त्रिपूराची गोपा, ओडीशाचा बिभू, पंजाबची मनजोत.. हे पाच तरुण चित्रकार, शिल्पकार, भारताच्या पाच प्रांतातून आलेले पाच कलाप्रवाह मध्यप्रदेशातील  छिंदवाडा जिल्ह्य़ातील व नागपूर – महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या  पारडसिंगा नावाच्या छोट्याश्या गावात, तिथल्या भूमिवर – धरेवर आपल्या  चित्रांच्या सोहळ्यासाठी  – ग्राम धरा चित्र उत्सवासाठी जमा झाले.

                             ललित  विकमशी आणि श्वेता भट्टड  ह्या दोन तरुण कलाकारांच्या मनातील संवेदनशीलतेचे  प्रकटीकरण  म्हणजेच “ ग्राम धरा चित्र उत्सव”! आपल्या कलेला केवळ पैसे  कमावण्याचे साधन न समजता कलेकडे एका  वेगळ्या दृष्टीकोनातून बघून तिला चार भिंतीत बंदिस्त न करता सामान्य माणसाशी विशेषतः ग्राम जीवनाशी जोडून समाजाभिमुख केले. गावातील लोकांच्या, शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत चांगल्या, वाईट गोष्टी कलेतून उजागर करुन इतरांपर्यंत त्या  पोहोचवणे हे महत्वाचे काम “ ग्राम ” करत आहे. त्यासाठी देशातील व विदेशातील कलाकारांना, वेगळ्या वाटेने जाणऱ्या शोधकांना ( explorers ), पारडसिंगा ( श्वेताचे पैत्रिक गाव) येथे आमंत्रित करुन त्यांच्या Art residencies – निवासी कला प्रकल्प राबविले जातात. ह्याच उपक्रमातील “ ग्राम धरा चित्र उत्सव ” ह्या प्रोजेक्ट साठी हे पाच तरुण चित्रकार पारडसिंग्याला आले आहेत. नेदरलँड ह्या देशाची मथिल्डा नावाची तरुणी जी सायकॉलॉजिस्ट आहे ती पारडसिंग्याला काही दिवसांपासून अभ्यासासाठी आली आहे. आलेल्या चित्रकारांकडून स्फूर्ती घेऊन ती सुद्धा ह्या ग्राम धरा चित्र उत्सवात सहभागी झाली आहे.

                                 तसेच पारडसिंगा गावातील एक उत्साही तरुण शेतकरी – गणेश ढोके – जो गेल्या तीन वर्षांपासून “ ग्राम ” शी जोडला गेला आहे, तो सुद्धा त्याच्या शेतात एक धरा चित्र  ( Land art) करणार आहे. मे 2016 मध्ये  “ग्राम ” ने Land art केले होते व त्यात त्यांनी  माननीय  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींचा चेहरा बनवला होता व त्याखाली  ‘ Grow in  India ‘ असे  लक्षवेधक वाक्य लिहीलेली प्रतिमा  ( image ) बनवली होती. ह्या  प्रोजेक्ट मध्ये गणेशचा सक्रीय  सहभाग होता.

                                   ह्या वेळेसच्या residency चे वैशिष्ट्य म्हणजे ह्या वेळेस ह्या चित्रकर्त्यां सोबत  संवाद  साधण्यासाठी पाच वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत चांगले काम करणारे, समाज उभारणीसाठी झटणारे असे पाच जाणते जन ही होते. हे पाच  तज्ञ पुढीलप्रमाणे  –

                                    1.  भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द  धरण विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या  न्याय्य  हक्कासाठी लढणारे श्री विलास भोंगाडे सर –  ह्यांनी त्यांच्या आंदोलनाची माहिती दिली. धरण विस्थापित शेतकऱ्यांच्या, गावकऱ्यांच्या समस्यांची ओळख करून  दिली. त्यांच्या creative आंदोलनांबद्दल ऐकताना आपल्या समस्या, प्रश्न किती कल्पकतेने आंदोलनातून मांडून संबंधितांपर्यंत पोहोचवता येतात ह्या बद्दल माहिती मिळाली.

                                    2.  Airport authority of India  मध्ये मोठ्या हुद्द्यावर असताना नोकरी सोडून पूर्ण वेळ शेतीसाठी देणारे श्री अमिताभ पावडे सर ह्यांनी कृषि अर्थकारण  ( agrarian economy ) व शेतकऱ्यांचे हक्क  ह्या विषयांवर प्रकाश टाकला. संपूर्ण जगाच्या अन्नधान्यावर मूठभर धनदांडग्यांच्या कंपन्यांचे नियंत्रण राहण्यासाठी, त्यांच्या तिजोरीत आणखीन भर पडण्यासाठी अन्न निर्मात्याला –  शेतकऱ्याला कसे जाणूनबुजून  कंगाल केले जात आहे हे समजावून सांगितले.

                                     3. प्राजक्ता  उपाध्याय आणि  4. अतुल  उपाध्याय   –  हे दोघेही त्यांच्या श्रमातून, उद्योगातून मिळणारा पैसा सामाजिक कार्यासाठी वापरणारे संगणक तज्ञ व उद्योजक. सध्याच्या शैक्षणिक संस्थांमधून मुलांची सर्जनशीलता कशी संपवली जाते व अशा  शाळांमधून बाहेर पडणाऱ्या मुलामध्ये तो मोठा होईपर्यंत किती संवेदनशीलता, सर्जनशीलता, सूजाणता शिल्लक असेल, ह्या विचार करायला लावणाऱ्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे शिक्षण म्हणजे ज्ञान मिळवणे ( learning ) हे न राहता मुलांमधील नैसर्गिक उत्सुकता व सर्जनशीलतेला दडपणारे ( curbing of children’s natural curiosity  & creativity ) साधन झाले आहे हे सांगितले.

                                     5.  सतत शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार व निसर्गपूरक पद्धतीने जीवन जगणारे वर्ध्याचे श्री वसंत भाऊ फुटाणे ह्यांनी सेंद्रीय शेती व ती पिकवणारा सेंद्रीय शेतकरी ह्यांच्या समस्या काय आहेत हे समजावून सांगितले. तसेच विकासाच्या नावाखाली निसर्गाचा समतोल कसा बिघडत चालला आहे व त्याचे मानवावर व पशू, पक्ष्यांवर किती घातक परिणाम  होत आहेत ह्या बद्दल माहिती दिली.

                                     कल्याणी, गोपा, बिभू, मनजोत व प्रियांका हे  चित्रकार हटके  आहेत. ह्यांनीही आपल्या कलेला केवळ पैसे कमावण्याचे साधन न बनवता निसर्ग, माणूस व प्राणी ह्यांच्यातील समन्वय कलेच्या माध्यमातून साधला आहे. तसेच सामाजिक प्रश्नांनाही त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून मांडले आहेत. तसेच त्यांच्या कलेतून ते जमिन व जमिनीवरच्या माणसासोबतचे नाते  व्यक्त करतात. म्हणूनच ह्यातील काही जणांनी ह्या  ग्राम धरा चित्र उत्सवात सहभागी होता व्हावे म्हणून आपली नोकरी सोडली आहे. काही जण त्यांचे art exhibition सोडून तर काही जण  नोकरीतून रजा काढून आलेले आहेत.

                                        सुरुवातीचे तीन दिवस आलेल्या तज्ञांनी ह्या चित्रकर्त्यांना शेती, शेतकरी व एकूणच त्याबद्दलचे समाजकारण, राजकारण व अर्थकारण काय आहे व कसे आहे ते समजावून सांगितले. अशाप्रकारे artists ना चांगलाच खूराक मिळाला. तज्ज्ञांकडून मिळालेले मौलिक व मूलभूत ज्ञान व त्यांची स्वतःची कल्पनाशक्ती ( imagination ) ह्यातून ह्या कलाकारांनी अतिशय समर्पक अशा प्रतिमा तयार  केल्या. ह्या चित्रांचे आलेख ( graph ) सात वेगवेगळ्या शेतांमध्ये टाकून त्यात हिरव्या व लाल भाज्यांच्या बियाणे  टाकले जाईल. जेंव्हा त्या बिया अंकूरित होऊन लाल व हिरव्या रंगाच्या भाज्या उगवतील तेव्हा ह्या प्रतिमा – images ठळकपणे दृश्यमान होतील.